Sunday, June 13, 2010

शब्दांजली

होडीत मी एकटाच आहे.....


अन शांत ही आहे....


आजुबाजूचा तमाशा डोळे भरून पहातोय


अन त्या अथांग समुद्रात लाटांसवे नाचतोय.






कानांशी किंचाळतोय तो मस्तवाल समीर


अन डोळे पहात आहेत लाटांचे लाटांशीच समर.


विचार आला....मज काय उपयोग या इंद्रियांचा ?


जसा जलास हवेचा अथवा वृद्धांस स्वप्नांचा.






ज्या कानांस लाविला शब्दांचा लळा


त्याच कानांत बैसलाय आवाजाचा दडा.


ओठ ज्याचा जन्म अन कर्ण ज्याचे थडगं


त्या आवाजाच्या दुनियेत काय विशेष अन काय वाउगं .






हो ! आवाजच तो नव्हे तो शब्द .


जया पायी हात जोडून द्वैत अद्वैत स्तब्ध .


शब्द हाच परिचय हृदयास हृदयाचा


जसा नवजात अर्भक स्त्री च्या मातृत्वाचा .






विहीरीत फेकलेला दगड कधीच तरंगत नसतो


अन हृदयी जन्मला शब्द कधीच विरघळत नसतो.


शब्द म्हणजे ओठांवर जिभेचा आघात


जणु स्वैर कुंजरावर माहुताची मात.






सागरात ’श’कार अन नभात ॐकार


अवनी वरती शब्द रुपी भगवंत साकार.


वायूत ’उ’कार अन अग्नीत ’चित’कार


जन्मणार्या प्रति क्षणाचा शब्द हाच शिल्पकार .






अंतरीचा शब्द शोधीता मिटले ते लोचन


अन मग शब्दास पुरविले भाषेचे व्यंजन.


संसाराच्या अवघड गुंत्यास अखेर देऊनी तिलांजली


आज विचारांनी भाषेस वाहिली खास शब्दांचीही शब्दांजली.